मुंबई – डिलाईल पुलाला जोडून जिने आणि सरकते जिने लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे पुलावरून चालण्यासाठी मार्गिका तयार करण्यात येईल. पुलाखाली मोकळ्या जागेत उद्यान व क्रीडा तसेच मनोरंजनाच्या सुविधेसाठी देखील लवकरच भूमिपूजन करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या डिलाईल पुलाचे लोकार्पण गुरुवारी (दिनांक २३ नोव्हेंबर २०२३) सायंकाळी समारंभपूर्वक करून संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यावेळी दीपक केसरकर हे बोलत होते. यावेळी राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशीष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सदा सरवणकर, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार किरण पावसकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री केसरकर म्हणाले की, डिलाईल पूल वाहतूकीप्रमाणेच पादचाऱ्यांसाठीदेखील महत्वाचा आहे, हे लक्षात घेऊन या पुलाला जिने आणि सरकते जिने जोडण्यात येणार आहेत. पुलावर पादचाऱ्यांसाठी मार्गिकेची सुविधा करण्यासाठी निर्देश दिले आहेत. या पुलाखाली उपलब्ध झालेल्या जागेचा नागरी हिताच्या दृष्टीने उद्यान, क्रीडांगण व मनोरंजन आदी कारणांसाठी विकास करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरात प्रवेशाची स्थानिक नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात येईल. स्थानिक पातळीवर नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याअनुषंगाने मार्केटच्या ठिकाणी नवा आराखडा अंमलात येईल. तसेच मार्केटमध्ये मासळी विकणाऱ्यांसाठी अधिक सुविधा देण्याच्या अनुषंगाने चांगल्या दर्जाचे स्टॉल उभारणीही याठिकाणी करण्यात येईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, नागरिकांना सरकत्या जिन्याची व्यवस्था प्राधान्याने करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या पुलाचे नामकरण करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेण्यात येईल, असे लोढा यांनी नमूद केले. आमदार आशीष शेलार म्हणाले की, या पुलाच्या पूर्णत्वासाठी सर्वांनीच योगदान दिले आहे. रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यादरम्यान समन्वय साधून सर्व समस्यांवर मात करत हा प्रकल्प आज लोकांसाठी खुला झाला आहे. या पुलाच्या भागातून चालण्याची व्यवस्था, सरकता जिना यासाठीचे कंत्राट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. ही कामेदेखील कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच पुलाखालील जागेचा उपयोग करून कबड्डी, खो खो यासारख्या क्रीडा तसेच इतर मनोरंजन सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात येतील, असे शेलार यांनी नमूद केले.