मुंबई महापालिकेच्या कार्यालयात असलेले मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय अनेक कारणांमुळे वादात आले होते. मुंबई पालिकेशी त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे कार्यालय महापालिकेत का? असा वाद निर्माण झाला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय हे निवडणुकीपुरतेच असणार आहे असे स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिकेची मुदत संपल्याने आणि पुढील निवडणूक न झाल्याने पालिकेचा कारभार प्रशासकामार्फत सुरू आहे. परिणामी गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील राजकीय पक्षांची कार्यालये बंद आहेत. पण काल अचानक पालिका इमारतीत पहिल्या मजल्यावर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय सुरू झाले आहे. या ठिकाणी आधी बाजार आणि उद्यान समितीचे कार्यालय होते. या कक्षावर मंगलप्रभात लोढा, पालक मंत्री (मुंबई उपनगरे) यांचे ‘नागरिक कक्ष’ कार्यालय अशी पाटी लावली आहे. नगरसेवकांअभावी नागरिकांना त्यांची गार्हाणी मांडण्यासाठी हा कक्ष उघडण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात येथे भाजपच्या माजी नगरसेवकांचा तसेच कार्यकर्त्यांचा राबता सुरू झाला आहे.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या कार्यालयाला आक्षेप घेतला आहे. ‘पालकमंत्र्यांना महापालिकेत कार्यालय कशासाठी? त्यांचा महापालिकेशी संबंध काय? त्यांनी तत्काळ आपले कार्यालय खाली करावे. आम्ही मंत्री असताना महापालिकेत बैठका घेतल्या. पण कुठेही असे दालन हडपले नाही. हे थांबले पाहिजे. नाहीतर मग मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौरांना दालन दिले पाहिजे. आम्हाला मुंबईचे आमदार म्हणून महापालिकेत केबिन दिली पाहिजे. या दालनात पालकमंत्री नाही तर भाजपचे माजी नगरसेवक बसले होते. नगरसेवकांची कार्यालये बंद केली. पण आता हे महापालिकेत घुसखोरी करून दादागिरी करत आहेत. हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या 24 तासांत महापालिकेतील हे कार्यालय रिकामे केले नाही तर मुंबईकर आपला राग दाखवतील,’ असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर ही बाब निर्दशनास आली होती. सत्तेत आल्यानंतर भाजपा महापालिकेत घुसखोरी करु पाहात आहे. त्याचा हा परिणाम असल्याची टिका शिवसेनेकडून करण्यात आली होती.
पण आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत या वाद मिटवला आहे. सध्या नागरिकांची कामे होणे गरजेचे आहे. त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. ज्यावेळी महापालिकेच्या निवडणुका होतील त्यानंतर हे कार्यालय येथून बंद करण्यात येईल. असे फडणवीस यांनी सांगितले आहे.