शुक्रवारी मध्यरात्री नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थिती नंतर झालेल्या नुकसानाची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी प्रत्यक्ष भेट देत पहाणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगर परिसरात भेट देत थेट नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांची माहिती जाणून घेतली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावरून काँग्रेसने भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मात्र या टीकेला भाजपने प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे पाहणी करत असताना, अनेक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत होते. याचा एक व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस एक कार्यकर्त्याचा हात ओढून त्याला समोर आणताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर शेअर करत भाजपवर टीका केली. यामध्ये पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी. हीच काय आपल्या मतदारांनासोबत वागण्याची पद्धत? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार? या शब्दांत काँग्रेसने हल्लाबोल केला. पण यावर भाजपने अधिकृत ट्विटर हँडलवरून खुलासा आता केला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा
अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. त्यामुळे लगे रहो…!, या शब्दांत भाजपने काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.