मुंबई – आशियाई स्पर्धेत भारताचा शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या मुंबईची कन्या ऐश्वर्या मिश्रा हिला शासकीय सेवेत नोकरी देण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी रविवारी केली. या मागणीबरोबरच म्हाडाच्या माध्यमातून तिला हक्काचे घर मिळवून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. या मागणीसंदर्भात भाई जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दहिसर पूर्वेकडील धारखाडी भागात बैठ्या चाळीत १०/१० च्या खोलीत राहणाऱ्या ऐश्वर्या कैलास मिश्रा या तरुणीने आशियाई खेळात 400×4 रिले स्पर्धेत भारतासाठी रजत पदक पटकावले आहे काँग्रेस परिवारातर्फे ऐश्वर्या व तिच्या कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आमदार भाई जगताप रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी तिच्या घरी आले. त्यांच्या सोबत मुंबई काँग्रेस सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, सदानंद चव्हाण, मुंबई काँग्रेस सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, प्रदेश प्रतिनिधी अभय चौबे, ब्लॉक अध्यक्ष रियाझ खान तसेच राजेश निर्मल, अनंत जाधव , प्रमोद लोकरे रविंद्र किणी ऑस्कर रॉड्रिग्ज इतर मान्यवर उपस्थित होते.

तिचे वडील भाजीपाला विक्रेते असून एवढयाशा घरात राहून आपल्या मुलीला शिक्षण व खेळासाठी प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांना भाईंनी धन्यवाद दिले. देशाला, महाराष्ट्राला अभिमान प्राप्त करून देणाऱ्या मुंबईतील एकमेव ॲथेलिट खेळाडू ऐश्वर्याचे कौतुक करत असताना शासकीय नोकरी व राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने म्हाडा इमारतीत घर द्यावे अशी मागणी माननीय मुख्यमंत्र्याकडे केली असून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *