मुंबई – दरवर्षी दीपावलीच्या काळात जैन धर्मीय बांधव भगवान महावीर यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान महावीर यांना मोक्षाची प्राप्ती झाली होती. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात येतो. यंदा १३ नोव्हेंबर रोजी भगवान महावीर यांचा हा २५५० वा महानिर्वाण दिन असून, हा दिवस राज्यात सर्वत्र साजरा करण्याबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, राज्यात भगवान महावीर यांचा २५५० वा महानिर्वाण महोत्सव साजरा केला जाणार आहे.
यंदाचे वर्ष हे भगवान महावीर यांच्या निर्वाणाचे २५५० वे वर्ष असल्याने सोमवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी भगवान महावीर यांचा २५५० वा महानिर्वाण महोत्सव साजरा करू इच्छिणाऱ्या संस्थांना प्रशासकीय पातळीवरून आवश्यक सहकार्य करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करावे, असे केल्यास महोत्सव साजरा करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे सर्व नियम आणि अटींसह मोठ्या प्रमाणात हा महोत्सव साजरा करण्याची योजना आहे, याबाबत आपण आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी विनंती मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. या पत्रास सकारात्मक उत्तर आल्यामुळे, राज्यात भगवान महावीर यांचा २५५० वा महानिर्वाण महोत्सव साजरा करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यासाठी जैन समाजाच्या नागरिकांनी मंत्री लोढा यांचे आभार व्यक्त केले आहेत.