मुंबई – लोकांच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य करावे की नाही, याचे भान जितेंद्र आव्हाड यांना राहिलेले नाही. मुळात ‘जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे.’ आव्हाड यापूर्वी मंत्री होते. अशा जबाबदार व्यक्तीने काय बोलावे, याचे भान राखले पाहिजे, असा टोला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील मेळाव्यात वादग्रस्त विधान केले. राम मांसाहार करायचा, या त्यांच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. त्यानंतर गुरुवारी आदिती तटकरे यांनी त्त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
गुरुवारी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना आदिती तटकरे म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केले ते कुणीही करू नये. लोकांच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य कुणीही करता कामा नये. आव्हाड यांनी देव-देवतांविषयी केलेले वक्तव्य योग्य म्हणता येणार नाही. ते यापूर्वी मंत्री होते. त्यामुळे अशा व्यक्तीने काय बोलावे आणि काय बोलू नये, याची त्यांना जाणीव नसावी, हे दुर्दैव आहे, अशी टीका आदिती तटकरे यांनी केली.