मुंबई – अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नासंदर्भात गेल्या सहा ते सात महिन्यात महिला व बालविकास मंत्री म्हणून जवळपास १० ते १२ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. उर्वारित जे प्रश्न आहेत, या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही या अगोदरच देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, अंगणवाडी सेविकांच्या काही प्रश्न हे केंद्र सरकारच्या अख्त्यारित असून त्यासाठी केंद्र सरकारबरोबर पाठपुरावा सुरु असून राज्यातील ७० हजार मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून हा संप मागे घेण्याचे आवाहन राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी बोलताना केले.
यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी बैठक घेण्यात आल्या असून त्यापैकी अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आम्ही जवळपास १३ हजार मिनी अंगणवाड्या श्रेणीवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे जवळपास १३ हजार अंगणवाडी सेविका आणि १३ हजार मदतनीसांची पदे निर्माण झाली आहेत. याशिवाय मार्च २०२३ मध्येच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याची अंमलबजावणी त्वरीत एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात आल्याची माहितीही तटकरे यांनी यावेळी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने बारावी उत्तीर्णबाबतची ठेवलेल्या अटीमुळे राज्यातील जवळपास ३ हजार दहावी पास अंगणवाडी सेविकांना त्याचा फटका बसत होता. हा प्रश्नही आम्ही मार्गी लावला आहे. त्याशिवाय अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या भाऊबीज देखील आम्ही दिवाळी अगोदरच दिली होती. त्याचबरोबर स्मार्ट फोनचे वाटप वेळेत करण्यात आले होते. आज अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ६० हजार मुलांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. त्यामुळे जर अंगणवाडी सेविका जर संपावर गेल्या तर त्याचा फटका बसू शकतो. जे काही प्रश्न आहेत, त्यावर नक्कीच मार्ग काढण्यात येणार असून त्यासाठी संप हा मार्ग नव्हे. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन आदिती तटकरे यांनी यावेळी केले.