मुंबई – दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान उपलब्ध व्हावं, यासाठी महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कला मंडळ यांना रावण वध आदल्या दिवशी करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या शिंदे सरकारचा निषेध मुंबई कॅांग्रेसने केला आहे. हा भारतीय संस्कृती आणि लोकांच्या श्रद्धेसोबत खेळ आहे, असं म्हणत मुंबई कॅांग्रेसने हा निर्णय मागे घ्या, अन्यथा परिणामांची तयारी ठेवा, असा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कला मंडळ गेली ४८ वर्षं आझाद मैदानात रामलीला आयोजित करतात. यंदा दसरा मेळाव्यासाठी मैदान उपलब्ध व्हावं, यासाठी सरकारने या दोन्ही मंडळांवर दबाव टाकला आहे. या मंडळांना रावणवध आदल्या दिवशी करा किंवा इतर ठिकाणी रामलीला स्थलांतरित करा, असं सत्ताधाऱ्यांचे म्हणणं आहे. याचा निषेध करत मुंबई प्रदेश कॅांग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. तसंच लाखो लोकांच्या श्रद्धेचा अनादर आहे. रामलीला जिथे सुरू होते, तिथेच रावणवध होणं अपेक्षित असतं. मात्र या सरकारने सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवत रावणवध आदल्या दिवशी करा, असा चमत्कारिक सल्ला दिला आहे. भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्यांना हे शोभत नाही, अशी टीका प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली. सरकारने आपला हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा लोक आंदोलन करतील आणि मुंबई प्रदेश कॅांग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *