ब्रेकअपचे नियम जाणून घेणे गरजेचेब्रेकअपचे नियम जाणून घेणे गरजेचे

Valentines Week Special सध्या सुरु आहे. अनेकांची मनं नव्याने जुळून येतील. काही जणांना या काळात त्यांचे इच्छित जोडीदार मिळतील. तर काही जणांची मनही दुखावली जातील. जर तुमचे या काळात ब्रेकअप झाले असेल तर तुम्ही काही चुकाही टाळायला हव्यात. अनेकदा जोडप्यांमधील हे ब्रेकअप एक वेगळेच वळण घेताना दिसतात. यासाठी काही परिस्थिती नक्कीच कारणीभूत असते. परंतु काही गोष्टी तुमच्या हातातही असतात. ब्रेकअप झाल्यानंतर काही गोष्टी या आवर्जून करायला हव्यात आणि चुका या नक्कीच टाळायला हव्यात असे केले तर तुम्हाला तुमच्या ब्रेकअपचा त्रास नाही तर काही गोष्टी चांगल्यासाठी होतात असे वाटेल.

सोशल मीडियावर पोस्ट करणे

खूप वर्षांचे नाते अचानक तुटले की त्याचा त्रास होतो. इतरांना त्याचे कारण किंवा मागील पार्श्वभूमी सांगणे हे खरंच गरजेचे नसते. दोन जणांचे ज्यावेळी पटत नाही अशाचवेळी अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. इतरांना कारण देताना आपल्याकडून काही वाईट गोष्टी निघण्याची शक्यता असते. दुसऱ्याबद्दल असलेला राग तिसऱ्याला सांगताना त्याचे परिणाम हे पुढे जाऊन चुकीचे होऊ शकतात. अशावेळी सगळ्या गोष्टींपासून लांब राहणे हे केव्हाही चांगले. त्यालाच आपण सोशल डिटॉक्स म्हणू शकतो. काही काळासाठी तुम्ही सगळ्या सोशल माध्यमांपासून आणि लोकांपासून दूर झालात तर काहीही हरकत नसते. कालांतराने सगळ्यांना गोष्टी विस्मरणात जातात.

सूड उगवण्याची भावना

तुम्ही ज्याच्यासोबत प्रेम करता त्याचे वाईट कधीच चिंतू शकत नाही. काही परिस्थितीमुळे तुमचे नाते पुढे जाऊ शकत नसेल तर त्याला इतर काही गोष्टी जबाबदार असतात. त्यासाठी दुसऱ्यावर राग ठेवून त्याचे काहीतरी वाईट व्हावे असा विचार करणे प्रेमाचे लक्षण ठरत नाही. एखाद्यावर तुमचे जिवापाड प्रेम असेल तर त्याला जाऊ देणे हाच एक उत्तम पर्याय असतो. अनेकदा सूड घेण्याच्या भावनेतून खूप जण चुकीच्या गोष्टी करुन बसतात आणि आपले आयुष्यही खराब करुन टाकतात. त्यामुळे ही भावना मनात कधीच येता कामा नये.

मोकळेपणाने बोलून नाते संपवणे

एखाद्यासोबत आपले नाते संपताना तुम्ही त्याच्याशी बोलणे गरजेचे असते. इतरांचा कोणताही सल्ला घेण्यापेक्षा तुमचं मन काय म्हणत ते बघा. कारण दोन जणांची गोष्ट तिसऱ्यासमोर गेली तर त्याचा विपर्यास होऊ शकतो. काही जण चांगलं सांगण्याऐवजी सूडाची भावना वाढवतात. त्यापेक्षा दोन जणांनी बोलून जर तो विषय योग्य समजून घेऊन संपवला तर त्यातून लवकर मार्ग निघू शकतो. जितक्या जास्त जणांना ही गोष्ट कळेल तितके मतमतांतर त्यामध्ये होईल. हेच टाळणे गरजेचे असते.

गैरसमज टाळा

जोडी देवाने बनवलेल्या असतात असे आपण म्हणतो. मग त्या तुटतात कशा ? असा प्रश्नही खूप जणांना पडतो. अनेकदा जोडप्यांमध्ये संशय हा महत्वाचे कारण बनतो. ज्या नात्यात संशय आले ते नाते कधीच टिकत नाही. कारण संशय ही एखाद्या वाळवीप्रमाणे असते. ती दिसली नाही तरी वाढते तसाच संशय हा सतत येत राहतो. असा संशय तुम्हाला जोडीदारावर असेल तर त्याचे रुपांतर भयावह होण्याआधी तुम्ही ते नाते तोडणे कधीही चांगले. कारण अनेकदा संशय असलेले नाते हे वाईट होऊनच तुटते हे दिसून आले आहे

तुम्हालाही असे वाटत असेल की आपले नाते योग्य नाही तर योग्य वेळी शांतपणे आणि एकमेकांचा आदर ठेवत ब्रेकअप करा जेणेकरुन तुम्ही स्वत:ला आणि इतरांना त्याचा त्रास देणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *