मणिपूरमधील त्या दोन महिला, दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटू या सगळया महिलांना सुरक्षित वाटावे असे सरकार आणण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही देशाच्या रक्षणासाठी भारतमातेच्या रक्षणासाठी एकत्र आलो आहोत. आजच गॅसचे भाव २०० रूपयांनी कमी करण्यात आले. जसजशी इंडिया आघाडी भक्कम होईल तेव्हा एक दिवस असा येईल की हे सरकार गॅस फ्री देईल. कारण सरकार गॅसवरच आहे. त्यामुळे भाव कमी केले तर आश्चर्य नाही, असा टोला गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लगाविला.
मुंबईत गुरुवारपासून सुरु होणाऱ्या इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक सुरु होत आहे. त्या पार्श्वभूवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी वरील तोफ डागली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, शेकाप नेते जयंत पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी अनेक चेहरे आहेत. भाजपाकडे कोणता पर्याय आहे हे त्यांनी सांगावे. जो आहे त्याने दहा वर्षांत काय केले. कर्नाटकात तर बजरंगबलीला आणूनही काहीच फायदा झाला नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगाविला. आमची विचारधारा वेगवेगळी आहे पण उद्देश एकच आहे देश आणि संविधानाची रक्षा करणे. हुकुमशाही नष्ट करणे. चलेजाव आंदोलनाची मुंबईतूनच सुरूवात झाली होती. ब्रिटीशपण विकास करत होतेच ना. आम्हाला विकास पण हवा पण स्वातंत्रयही हवे. त्याचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. कालच्या निती आयोगाच्या बैठकीनंतर मुंबई तोडण्याचा यांचा डाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. पण राज्यात आणि केंद्रात आमचे सरकार आल्यानंतर यांचे सर्व उफराटे निर्णय परत फिरवू असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.
विचारधारा वेगवेगळी असली तरी इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. देश आणि संविधानाची रक्षा करणे, हुकुमशाहीला घालविणे हे आमचे लक्ष्य आहे. लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत व राहू. भारतमातेच्या हातात कोणत्याही हुकुमशहाला बेडया घालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.