मुंबई – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या धर्तीवर देश- विदेशातील तब्बल ३० हून अधिक नामांकित उच्च शिक्षण संस्थांबरोबर मुंबई विद्यापीठ शैक्षणिक सामंजस्य करार करणार आहे. शुक्रवार १९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता सर ज. जी. कला, वास्तुकला व उपयोजित कला महाविद्यालय आवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह देश-विदेशातील विविध उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनीधी उपस्थित राहणार आहेत.

पर्ड्यू विद्यापीठ, सेंट लुईस विद्यापीठ, मॉरिशस कल्चरल सेंटर, इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, प्राईस वाटरहाऊस कुपर, रिटेलर्स असोसिएशन स्किल काँऊंसिल ऑफ इंडिया, सासमीर, एनएसडीसी, समीर, आयसीसीआर, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल विद्यापीठ, बार्टी, सीआयडीएम, स्वामीनारायण एकेडमिक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, वृंदावन गुरुकुल, ओटीएआय, द कलर सोसायटी, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर आणि ठाणे, गो शुन्य यासारख्या विविध नामांकित संस्थाबरोबर मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक सामंजस्य करार होणार आहेत.

अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, विद्यार्थी-शिक्षक आदान –प्रदान विविध शैक्षणिक कार्यक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन ज्यामध्ये ऑटोमेटेड सिंथेसाईझर आणि कृत्रिम बुद्धीमत्ता, अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षणासह विद्यार्थी शिक्षक आदान-प्रदान, सह-दुहेरी पदवी, श्रेणी हस्तांतरण, ऑनलाईन इंटर्नशिप, सह सांस्कृतिक कार्ये आणि शैक्षणिक साहित्य-संसाधन निर्मिती व हस्तांतरण अशा विविध क्षेत्रातील संधीचे दालन यानिमित्ताने खुले होणार आहे. नुकत्याच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आयोजित ‘अखिल भारतीय शिक्षा समागम २०२३’ या कार्यक्रमात उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील इलिनॉस विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *