इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला बुधवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत केले असून यानंतर बॅनर्जी यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांची त्यांच्या जलसा या निवासस्थानी भेट घेत रक्षाबंधन साजरी केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, बॅनर्जी गुरुवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील होणार आहेत.
इंडिया आघाडीच्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसाठी देशभरातील विरोधक एकत्र आले आहेत. या बैठकीसाठी मंगळवारी रात्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांच्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मुंबईत दाखल झाल्यानंतर बुधवार सकाळपासून इतर अनेक नेते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या आहेत. तर त्याचबरोबर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांचे सुद्धा मुंबईत आगमन झाले आहे.
राहुल आणि सोनिया गांधी गुरुवारी मुंबईत येणार
इंडिया आघाडीच्या या बैठकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. त्याचबरोबर अखिलेश यादव, एम.के.स्टेलिन, अरविंद केजरीवाल आदी नेते मुंबईत येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेह भोजनाचे आमंत्रण
या बैठकीच्या निमित्ताने गुरुवारी संध्याकाळी अनौपचारिक बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली असून गुरुवारी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. १ सप्टेंबर रोजी बैठकीसाठी आलेल्या मान्यवरांचे ग्रुप फोटो काढण्यात येणार असून त्यानंतर इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसकडून स्नेह भोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी १ वाजता संयुक्त पत्रकार परिषदेनंतर या बैठकीची सांगता होणार आहे.