Maharashtra Monsoon Update : संपूर्ण भारतात सध्या गरमीची जीवघेणी लाट पसरली आहे. दिल्लीसह देशाच्या अन्य काही राज्यांत तापमानाचा पारा तब्बल ५० डिग्री पर्यंत पोहचला असून, अनेक भागांत पाण्याची भीषण टंचाई जाणवते आहे. त्यामुळे आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते मान्सूनचे. महाराष्ट्रातही काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवतो आहे. त्यामुळे केवळ बळीराजाच नाही तर, दरररोज कामावर येणारे जाणारे सर्वसामान्य लोक, उन्हातानात रस्त्यावर मोल-मजुरी करणारे माथाडी कामगार इतकंच काय तर घरात गॅस-शेगडी समोर राबणाऱ्या गृहिणी सर्वचजण, गरमीपासून दिलासा देणाऱ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

वेधशाळेच्या रिपोर्टनुसार, Monsoon भारतात दाखल झाला असून, 30 मे ला केरळच्या भूमीवर (Kerala Monsoon) पावसाच्या सरी बरसल्याचं पाहायला मिळालं. हवामान खात्याने याआधी वर्तवलेल्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सून केरळामध्ये दाखल होणार असल्याची चिन्ह होती. मात्र मे महिन्याचा अखेरीसच पावसाने हजेरी लावल्यामुळे लोकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?

हवामान खात्याच्या अहवालानुसार, केरळमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या पावसाच्या पुढील प्रवासासाठी सध्या पोषक हवामान आहे आणि त्यामुळे मान्सून लवकरच महाराष्ट्रात हजेरी लावण्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून केरळ पाठोपाठ कर्नाटकात दाखल होईल आणि त्यानंतर पुढे महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणजे साधारण ८ ते १० जून पर्यंत किंवा त्याआधीच पाऊस महाराष्ट्रात बरसण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला राज्यातील लोकांसाठी ही बातमी सर्वाधिक आनंद देणारी ठरेल यात शंकाच नाही.

Heat Wave पासून सावध राहण्याचा सल्ला

राज्यात लवकरच पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज जरी वर्तवला जात असला, तरी त्यापूर्वी राज्यात पसरलेल्या जीवघेण्या Heat Wave पासून सावध राहण्याचा सल्ला, हवामान खात्याने तसेच राज्य आरोग्य विभागाने दिला आहे. पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील काही भागात- जसे की विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची तीव्र लाट असणार आहे, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. त्यामुळे आवश्यकता नसल्यास लोकांनी घराबाहेर न पडण्याचा आणि जे लोक कामासाठी घराबाहेर पडत आहेत त्यांनी योग्य ती खबरदारी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

IMD च्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात पूर्व विदर्भ, मराठवाडा तसेत मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखल होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *