यंदाही शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या आतिषबाजीने यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. मनसेतर्फे या दीपोत्सवाच्या निमित्ताने यंदा पहिल्यांदाच शिवाजी पार्क येथे दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविले असून राज्यभरातील जवळपास सर्वच दिवाळी अंक याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून यंदा पहिल्यांदाच शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाच्या निमित्ताने दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाची मूळ जबाबदारी मॅजेस्टिक बुक डेपोचे अक्षय कोठावळे आणि मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी सांभाळली असून तब्बल 40 फूट लांबीच्या आवारात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. 9 तारखेपासून सुरु झालेल्या या प्रदर्शनासाठी मुंबईतील साहित्य रसिक याठिकाणी भेट देत आहेत.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने राज्यभरातील जवळपास 300 हून अधिक दिवाळी अंक या ठिकाणी वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने दीपावली, अक्षर, मौज, ऋतुरंग यासारख्या अनेक दिवाळी अंकाची पर्वणी साहित्य रसिकांना मिळत असल्याची माहिती मॅजेस्टिक बुक डेपोचे अक्षय कोठावळे यांनी दिली. सकाळी 11 वाजल्यापासून हे प्रदर्शन सुरु झाले असून याला वाचकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
या दिवाळी अंकांना मागणी
साहित्यिक दिवाळी अंकाबरोबरच पर्यावरण विषयक आणि गडकिल्ल्यांच्या दिवाळी अंकांना विशेष मागणी असल्याचे कोठावळे यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकीचा संदेश
यंदाच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने मनसेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. यात पहिल्या तीन दिवस कलाकारांच्याहस्ते रोषणाईचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर पुढील तीन दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा मान देण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नर्सेस, पोलिस अधिकारी आणि महापालिकेतील स्वच्छता कामगारांना हा बहुमान दिला जाणार आहे.