सरकार उबाठा शिवसेना पक्षाच्या आमदार व माजी नगरसेवकांना जाणीवपूर्वक विकास निधी न देऊन अन्याय करत आहे. जर येत्या काही दिवसांत निधी वाटप न झाल्यास शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने वॉर्ड ऑफिस स्तरावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्तांना दिला.
शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार व माजी नगरसेवक यांच्या विभागातील विकास कामांसाठी निधी न देऊन एकप्रकारे मुंबई महापालिका प्रशासन तेथील करदात्या जनतेवर अन्याय करत आहे. असमान विकास निधी वाटप, मुंबईतील रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ व असुविधा तसेच मुंबईतील इतर प्रश्न व समस्यांबाबत आज मुंबई महापालिका आयुक्त व पालिकेचे विभागीय सहायक आयुक्त यांच्यासोबत आज महापालिकेतील बैठक कक्षात शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार व माजी नगरसेवक यांच्यात बैठक पार पडली.
या बैठकी दरम्यान या लोकप्रतिनिधींनी असमान विकास निधी वाटपावरून महापालिका आयुक्तांना जाब विचारत आक्रमक भूमिका मांडली. तसेच पालिकेवर प्रशासक नेमला असताना पालकमंत्री त्यात हस्तक्षेप कसा काय करतात असा सवाल करत आयुक्तांना या लोकप्रतिनिधींनी धारेवर धरले.
शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आज मुंबईच्या विविध विषयांबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आमदार व माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना निवेदन दिले.
आज महापालिका आयुक्त यांच्या सोबत पार पडलेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पालकमंत्री यांच्या दालनात जाऊन पाहणी केली. तसेच विरोधी पक्षनेते म्हणून आम्हाला सुद्धा महापालिका मुख्यालयात कार्यालय मिळावे अशी मागणी केली.
यावेळी शिवसेना उबाठा गटनेते व आ.अजय चौधरी, प्रतोद व आ. सुनील प्रभू, आ.अनिल परब, आ.संजय पोतनीस, आ.सचिन अहिर, आ.सुनील शिंदे, आ.रवींद्र वायकर , आ.रमेश कोरगावकर, आ.विलास पोतनीस, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, माजी नगरसेविका विशाखा राऊत, भास्कर खुरसुंगे, सुरेश पाटील, बाळा नर, सचिन पडवळ, दीपमाळा बडे आदी उपस्थित होते.