सत्यजीत तांबेसत्यजीत तांबे

नाशिकमधील अमली पदार्थांच्या उत्पादनाचे पितळ उघडे पडल्यानंतर राज्यभरात चिंता व्यक्त होत आहे. ही सगळी परिस्थिती बघता गुन्हेगारी नियंत्रित करण्यात महाराष्ट्र मागे पडतोय का, असा प्रश्न आ. सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला. तसंच महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि सुसंस्कृत राज्यासाठी हे अशोभनीय आहे, अशी खंत व्यक्त करत गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी सरकारला केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळात अनेकदा सत्तापालट झाला. सरकारने राज्यात बदल घडविणे अपेक्षित असताना, उलट गुन्हेगारीचेच प्रमाण वाढताना दिसत आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात 1980-1990 चे दशक म्हणजे अंडरवर्ल्डच्या दहशतीचा काळ ओळखला जातो. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होतेय की काय? याचीच भीती वाटू लागली आहे. दुर्दैवाने आजही राज्यात तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा आणि नवनवीन स्वरूपातील गुन्हेगारी सध्याच्या काळात वाढलेली दिसतेय. त्यामुळे राज्यात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही आ. सत्यजीत तांबे म्हणाले.

मुंबई लोकलमधील तरुणांचा ड्रग्सची नशा करतानाचा व्हिडिओ, पुण्यातील कोयता गँग, महिलांवरील अत्याचार अशी अनेक प्रकरणे राज्यात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण दाखविण्यास पुरेशी आहेत. जनतेच्या सुरक्षेचा विचार करून ही वाढलेली गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अशीही मागणी आ. तांबेंनी केली आहे.

आतापर्यंत जप्त केलेला ड्रग्सचा साठा

राज्यातील वेगवेगळ्या शहरातून कोट्यवधी रुपयांचा साठा डीआरआयने जप्त केला. नाशिक मधून ३०० कोटींचा एमडी ड्रग्स साठा, सोलापूरातून १६ कोटींचा एमडी ड्रग्सचा साठा, मुंबईतून ७१ कोटींचे कोकेन जप्त, छत्रपती संभाजीनगरमधून २५० कोटींचे कोकेन जप्त आणि पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात ड्रग्सचा कारखाना उघडकीस आला आहे. यासर्व जप्तीच्या कारवाया ऑक्टोबर महिन्यात करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *