mahakali mandir

धवल सोलंकी

मुंबई : देशभरात सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ९ दिवस आपल्या  भाविक आपल्या लाडक्या माय माऊलीची अत्यंत भक्तीभावाने सेवा केली जाते. सर्वच मंडळात अष्टमीला होम हवन केला जातो मात्र मुंबईतील एका मंदिरात चक्क काल – रात्र उत्सव साजरा केला जातो. नेमका कसा केला जातो हा संपूर्ण सोहळा जाणून घ्या.

श्री क्षेत्र माता महाकाली मंदिर हे मुंबईतील प्राचीन व जागृत देवस्थांपैकी एक आहे. फार पूर्वी श्री भगवती महाकालीच्या साक्षात्कारानंतर सद्गुरू श्री स्वामी शामानंदांनी या मंदिराची उभारणी केली होती. इथल्या जुन्या जाणत्या स्थानिक रहिवाशांच्या माहितीप्रमाणे शंभराहून अधिक वर्ष या मंदिराचा आणि त्याचसोबत रुढी-परंपरा विधी उत्सवाचा इतिहास आहे. सद्गुरू श्री स्वामी शामानंदांच्या सदेह हयातकाळापासून नवरात्रौत्सव, मकरसंक्रांत उत्सवाची परंपरा आजही इथे जोपासली जाते.

शारदीय नवरात्रौत्सवातील काळरात्र उत्सव हा संपूर्ण मुंबईकर आणि आई महाकालीच्या भक्तभावीकांचा विशेष लक्षवेधी उत्सव. नवरात्रौत्सवाच्या महासप्तमी दिनी मध्यरात्री ठिक बारा वाजता हा विधी संपन्न होतो. अन्य सर्वत्र अष्टमी तथा नवमीचे होमहवन पुजा विधी होतात परंतु आई महाकालीचे हवन अनुष्ठान महासप्तमी दिनी होते.

सायंकाळी हवनपूजा आणि आरती संपन्न झाल्यावर लगबग सुरु होते ती काळरात्र उत्सवाची. मध्यरात्री ठिक बारा वाजता मंदिर प्रांगणात गडद अंधार केला जातो. आई महाकाली तथा क्षेत्र रक्षक श्री वेताळ भैरव यांचे समोर पूजा तथा कोहळा बळी अनुष्ठान विधी संपन्न होतात.

भूत-यक्ष-गण यांच्या वेशभूषा केलेली लहान मुलं यज्ञ मंडपाजवळ सुसज्ज होतात आणि अचुक बाराच्या ठोक्याला मंदिराच्या गाभाऱ्यात बारा दिवट्या हातात धारण करुन पुरुष सदस्य बाहेर पडून यज्ञ मंडपाकडे धाव घेतात व वाजत गाजत दिवट्या नाचवत यज्ञ मंडपाला प्रदक्षिणा घालतात. सोबतच भुत-यक्ष-गण यांच्या वेशभूषा केलेली लहान मुलंही त्यात सामील होतात. शिवकळा लागेली असंख्य भाविक स्री पुरुष यज्ञ मंडपात बेधुंद वारे खेळतात. हा विधी पाहण्यासाठी भक्तांची अफाट गर्दी होते. ठराविक वेळेनंतर पुन्हा सर्वत्र प्रकाश रोशनाई चालू केली जाते अंती आदिशक्ती आई महाकालीचा जयजयकार होतो आणि कार्यक्रमाची सांगता होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *