Mother In Law अर्थात सासू… आता खाष्ट सासू फारच दुर्मिळ गोष्ट आहे. पूर्वीचा काळ आता राहिलेला नाही. हल्ली सासू- सुनेचे नाते हे आई आणि मुलीसारखे असते. आपल्या मुलापेक्षाही सासूला हल्ली आलेली सून अधिक प्रिय असते. तिच्यासाठी कोणत्याही गोष्टी करायला ती तयार असते.काहींना हे पटणार नाही. त्यांना वाटत असेल आपली सून काही अशी नाही. ती काही आपल्यासाठी करत नाही. पण तुम्ही कधी सासूचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही ना? कधी तिच्या मनाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला ज्या 5 टिप्स देणार आहोत. त्या वाचा आणि त्यानंतर तुमची सासू आणि तुमचे नाते कसे खुलते हे आम्हाला कळवायला अजिबात विसरु नका.
तुलना करणे सोडा
आपल्या आईशी आपल्या सासूसोबत तुलना करणे सोडा. माझी आई माझे असे लाड करायची तसे करायची हे मनातून पूर्णपणे काढून टाका. तिच्या प्रेमाची तुलना करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईसाठी काय करायचा याचा विचार करा. तुमच्या आईसाठी तुम्ही सर्वस्व होता कारण तुम्ही तिच्यासोबत तितका वेळ घालवला होता. आपल्या सासूसोबत वेळ न घालवता तिला चुकीचे ठरवणे फार चुकीचे आहे. तुमच्या सासूची तुलना करण्यापेक्षा थोडं तिच्या मनाप्रमाणे देखील वागून पाहा. ती तुम्हाला तिच्या पद्धतीने प्रेम करण्यास सुरुवात करेल यात काहीही शंका नाही.
तिची आवड जाणून घ्या
तुमची सासू नोकरी करणारी असो वा घरी राहणारी तिला काय आवडते काय नाही याची माहिती करुन घेणे हे आपल्या हातात असते. जर तुम्ही तिची आवड जाणून घेतली तर तुम्हाला तिच्यासोबत राहणे सोपे जाईल. सुनेकडून सासूला केवळ प्रेमाची अपेक्षा असते. जर तुम्ही ते प्रेम तिला देऊ शकलात तर तिला तुमच्याबद्दल कोणतीही अढी राहणार नाही. तिच्या आवडीनुसार तिच्यासाठी काही गोष्टी करा. उदा. तिला फिरायला आवडत असेल तर तिच्यासोबत फिरायला जा, तिला शॉपिंगची आवड असेल तर तिच्यसाठी वस्तूंची खरेदी करा. तिला सोबत घेऊन जा. त्यामुळे तुमच्यामधील नाते हे अधिक दृढ होण्यास मदत मिळेल.
गैरसमज नको
आपली आईही आपण चुकलो की आपल्याला ओरडते. आपल्याशी अबोला धऱते. पर्यायी एक फटका देते. जर काही कारणास्तव तुमची सासू तुमच्यावर रागावली असेल तर त्यावरुन गैरसमज करण्यापेक्षा तिला समजून घ्या. तिला आपले काय खटकले हे जाणून घ्या. काही गोष्टी अबोला धरुन नाही तर बोलून सुटत असतात. त्यामुळे बोला. जे खटकले त्यावर पर्याय काढा म्हणजे जिथे कुठे नाते फिस्कटले असे वाटत असेल ते चांगले होण्यास मदत मिळते. शिवाय मनात अढी ठेवून राहण्यापेक्षा तिथल्या तिथे बोलून मोकळे होणे केव्हाही चांगले.
आदर करा
हाताची सगळी बोटं सारखी नसतात अगदी त्याचप्रमाणे सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात. कधी कधी काही गोष्टी या आधीपासूनच तुम्हाला आवडत नसतील आणि सासूलाही तुमच्या आवडत नसतील. पण त्यात फार पडण्यापेक्षा आणि इतरांना एकमेकींबद्दल सांगण्यापेक्षा नात्याचा आदर ठेवून काही गोष्टी घरात ठेवा. घरातील गोष्टी जेव्हा बाहेर जातात तेव्हा नाते चांगले होण्याची शक्यता फार कमी उरते. त्यात सासू- सुनेचे नाते हे असे असते की, खूप जण तुम्हाला चांगला सल्ला देणे हे फारच लांबचे आहे.
दोषही स्विकारा
बायकोच्या नवऱ्याबद्दलही अनेक तक्रारी असतात.पण त्या आपण कधीही कोणाला सांगत नाही. कारण ती तुमच्या दोघांमधील खासगी गोष्ट असते. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आणि सासूमध्ये काही खटके उडत असतील तर ते आपणच चांगले कसे करु यासाठी प्रयत्न करा. एकमेकांचे गूण जसे स्विकारता अगदी तसेच एकमेकांचे दोष स्विकारा त्यामुळे तुम्हाला कोणासोबत कसे वागायचे हे कळते आणि त्यामुळे नात्यात सलोखा राखणे फार सोपे होते.
आता सासू खराब असे म्हणण्यापेक्षा तिच्यासोबत एक चांगले नाते जपण्याचा प्रयत्न तर करुन पाहा.